राणी सईबाईंचा मृत्यू कसा झाला? व याचा शिवाजी महाराजांच्या जीवनावर काय परिणाम झाला?


पुढील उत्तर हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत असून एक चिकित्सात्मक उत्तर आहे. ह्या उत्तरास संदर्भासहित स्पष्ट करण्यास मी असमर्थ आहे. त्यामुळे स-संदर्भ उत्तर वाचायचे असल्यास पुढील उत्तर वाचू नये ही नम्र विनंती आहे. 😊🙏


राणी सईबाईंचा मृत्यू कसा झाला ?

-बाळंत रोग.

याचा शिवाजी महाराजांच्या जीवनावर काय परिणाम झाला?

एखादी राजकीय व्यक्ती त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कशी होती ह्याबद्दल इतिहास फारसे कधी बोलत नाही. शिवाजी महाराज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे होते ह्याबद्दल कोणत्याच साधनात जास्त माहिती आढळून येत नाही. शिवराय एक आदर्श पती किंवा पिता होते का ? हा प्रश्न जर तुम्ही इतिहासपुरुषाला विचाराल तर तो सुद्धा मूग गिळून गप्प बसेल; कारण त्याच्याकडे सुद्धा ह्याचे उत्तर नाही. इतिहासाकडे ह्याचे उत्तर नसणे हेच योग्य आहे; कारण आदर्श पती/पिता होण्यासाठी शिवरायांचा जन्म झाला नव्हता, त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे होते. ज्याला अवघ्या जगाचा संसार सांभाळायचा असतो त्याला स्वतःच्या संसाराकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे शिवराय संसारिक व्यक्ती असतील, असे मला तरी वाटत नाही.

शिवाजी महाराज ज्या कालखंडात होते त्या कालखंडात बादशहा शहाजहानने बायकोसाठी ताजमहाल बनवला. श्रीमंत बाजीरावसाहेबांनी मस्तानीबाईंच्या नावे दोन गावे इनाम केली. महाराजांनी त्यांच्या कोणत्याच राणीसाठी प्रेम प्रकट होईल असे काही केल्याचे माझ्या वाचनात आले नाही. इतकेच नव्हे तर, त्यापैकी बऱ्याच राण्यांच्याबद्दल फार अशी माहितीसुद्धा (जन्म-मृत्यू, समाधी, ई.) उपलब्ध नाहीये. स्वतः सईबाईसाहेबांची किल्ले राजगड आणि (स्थानिकांच्या मते) त्याच्या पायथ्याशी असलेल्या पाली गाव अशा दोन ठिकाणी समाधी आहे. त्यापैकी खरी समाधी नेमकी कोणती हे आपल्याला माहीत नाही. सबब शिवाजी महाराजांच्या आयुष्यात प्रेम, शृंगार, रसिकता, ई. गोष्टींना फार महत्व नव्हते आणि त्यांच्याकडे त्यासाठी वेळ देखील नव्हता, हे माझे मत आहे.

(राणीसरकार सईबाईसाहेबांची समाधी : किल्ले राजगड - पाली गाव)

इथे इतिहासाचार्य नरहर कुरुंदकर ह्यांची एका प्रस्तावनेत लिहलेली टिप्पणी मला विशेष महत्वाची वाटते.

जिजाबाईस एकूण सहा आपत्ये झाली. त्यांत संभाजी पहिला. शिवाजी दुसरा. असे दोन मुलगे वाचले. शहाजीचे जिजाबाईवर फार प्रेम नव्हते, असे दिसते. पण तिला बेताचे का होईना, संसारसुख शहाजीने दिले.

स्वतः शिवाजी महाराजांनीही आपले संसार असेच केले आहेत. कोणतीच बायको त्यांची लाडकी दिसत नाही. लग्न करावे, पोटभर अन्न, भरजरी कपडे, अलंकार, सोयीनुसार अंगभोग याच्यापलीकडे शिवाजीने कोणत्याच राणीला महत्व दिले नाही. सोयराबाई ही अभिषिक्त पट्टराणी ; पण तिलाही शिवाजीच्या मनात फारसे महत्व दिसत नाही.

त्यामुळे शिवाजी महाराजांचे महाराणी सईबाईसाहेबांवर फार प्रेम होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना खूप दुःख झाले, हे कथा-कादंबरी आणि टीव्ही मालिकांपुरतेच मर्यादित राहीले पाहिजे असे मला वाटते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूने होणारे दुःख आणि थोडे दिवस निर्माण होणारी पोकळी ह्या पलीकडे शिवरायांना जास्त काही वाटले नसणार. शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik) ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे, सईबाईंच्या मृत्यूचा जर सर्वात जास्त कोणावर परिणाम झाला असेल तर ते म्हणजे बाळ शंभूराजे. त्यांची फार फरफट झाली. सईबाईंचा मृत्यू झाला नसता तर कदाचित भविष्यात उद्भवलेले गृहकलह सुद्धा टळले असते. पण 'जर-तर'चा कल्पनाविलास इतिहासात चालत नाही.

शिवरायांना जर कोणाच्या मृत्यूने दुःख झाले असेल तर ते म्हणजे त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब होय. शिवाजी महाराज नक्कीच एक आदर्श पुत्र होते. त्यांचे त्यांच्या आऊसाहेबांवर खूप प्रेम होते. इ.स.१६६६ मध्ये केलेली जिजाऊंची सुवर्णतुला, रायगडाखाली जिजाऊंसाठी बांधलेला पाचाड कोट, तिथून १किमी वर असलेली त्यांची प्रशस्त समाधी असे कित्येक दाखले महाराजसाहेबांचे मातृप्रेम सिद्ध करतात. पण त्यांच्या पत्नीवर असलेले प्रेम सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाहीये.

धन्यवाद.

साभार:

Comments